गाझावरील हल्ल्यात ५२ जणांचा मृत्यू   

जेरूसालेम : इस्रालयने गाझावर सोमवारी मोठा हवाई हल्ला केला. त्यात ५२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये एका शाळेवरील हल्ल्यातील ३६ जणांचा समावेश आहे. निराधार पॅलेस्टिनी नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था शाळेत केली होती. त्या शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला. झोपेतच अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य कर्मचार्‍यांनी दिली. शाळेत दहशतवादी लपले होते. तेथूनच ते हल्ल्याची योजना आखत होते. त्यामुळे हल्ला केल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली. 
 
हमास दहशतवादी आणि इस्रायल यांच्यात मार्चमध्ये युद्धबंदी संपुष्टात आली होती. त्यानंतर गाझावर आक्रमक हल्ले इस्रालकडून सुरू आहेत. युद्धबंदीच्या काळात हमास दहशतवाद्यांनी काही ओलिसांची सुटका केली होती. अजूनही  त्यांच्या ताब्यात अजूनही ५८ ओलिस आहेत. त्यांची प्रथम सुटका करा, अशी मागणी इस्रायलची आहे. ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे हमास दहशतवाद्यांना संपविल्याशिवाय  कारवाई थांबणार नाही, अशी कठोर भूमिका इस्रायलने घेतली आहे. तसेच गाझापट्टी संपूर्णत: ताब्यात घेतली जाणार असल्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात मानवी मदत देण्यास इस्रायलने परवानगी दिली होती. सुमारे अडीच महिने ती रोखून ठेवली होती. 

Related Articles